Dr Kajbaje's, Madhumeha – Diabetes Speciality Clinics

Blog
डायबेटिसचे पेशंट आंबा खाऊ शकतात का ?

डायबेटिसचे पेशंट आंबा खाऊ शकतात का ?

()

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांनाच आंब्याचे वेध लागतात पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच डोकावून जातो की मी सुद्धा आंबा खाऊ शकतो  का?

 

आज आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत ज्यावेळी आपण डायबिटीसच्या दृष्टीने कोणतेही फळ चालेल का याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो त्या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स.

 

ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय ?

 

 ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखाद्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर किती प्रमाणात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे दर्शवणारा इंडेक्स. जर एखाद्या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तर असे फळ खाल्ल्यानंतर शुगर जास्त प्रमाणात वाढते आणि जर एखाद्या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल तर अशा फळाचे सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण फारसे वाढत नाही.

 

आंबा -फळांचा राजा

आंब्याची मधुर चव आणि त्याचा मनमोहक असा सुगंध आपल्याला त्याच्याकडे नक्कीच आकर्षित करतो. पोषण तत्वांचा विचार करता आंबा हे एक परिपूर्ण फळ निश्चितच म्हणता येईल. आंब्यामध्ये विटामिन सी विटामिन ए विटामिन बी सिक्स विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. एका आंब्यामधून साधारणतः 150 ते 180 कॅलरीज ऊर्जा मिळते. आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याकारणाने रक्तात साखरेचे प्रमाण मध्यम गतीने वाढते. या व्यतिरिक्त आंब्यामध्ये anti-oxidant आणि anti-inflammatory  तत्वांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आंबा नक्कीच फायदेकारक आहे

 

आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे?

आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा मध्यम प्रकारचा आहे थोडक्यात काय तर डायबिटीसचे पेशंट सुद्धा आंब्याचे सेवन करू शकतात. 

 

डायबिटीसच्या पेशंटनी कशाप्रकारे आंब्याचे सेवन करावे?

डायबिटीसचे पेशंट नक्कीच आंब्याचा आस्वाद घेऊ शकतात परंतु त्यांनी दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

1) आंबा खाण्याचे प्रमाण 

2) आंबा खाण्याची वेळ

 

डायबिटीसचे पेशंट किती प्रमाणात आंबा खाऊ शकतात?

 डायबिटीसचा पेशंट जर मोठ्या आकाराचा आंबा असेल तर एकावेळी अर्ध्या आंब्याचे सेवन करू शकतो किंवा जर आंबा मध्यम आकाराचा असेल तर एका वेळी एक आंबा ही ते घेऊ शकतो.  आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू नये यासाठी आंब्याचे सेवन एखाद्या प्रोटीन युक्त पदार्थ सोबत अथवा ज्या पदार्थात अधिक प्रमाणात फॅट्स आहेत अशा पदार्थांसोबत करू शकतात.

 

आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती?

आंबा शक्यतो आपल्या जेवणाबरोबर किंवा संध्याकाळच्या नाश्त्याबरोबर जर घेतला तर त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही. डायबिटीसचे पेशंट दिवसातून दोन वेळा अर्ध्या आंब्याचे सेवन करू शकतात.

 

डायबिटीस आणि आंबा

आपला डायबिटीस कोणत्या टप्प्यावर आहे आणि किती योग्य प्रमाणात नियंत्रणात आहे यावर आपण आंब्याचे किती सेवन करू शकता हे ठरते. ज्या व्यक्तींचा डायबिटीस योग्य प्रकारे नियंत्रणात आहे त्या व्यक्ती निश्चितच आंब्याचे सेवन करू शकतात.

आपल्या ब्लड शुगर वर काय परिणाम होत आहे हे पाहण्यासाठी आपण एक सोपा प्रयोग करू शकता आपण आंबा खाण्याआधी आणि आंबा खाल्ल्यानंतर दोन तासाने ग्लुकोमीटर वर ब्लड शुगर चेक करू शकता यावरून आंब्यामुळे आपल्या ब्लड शुगर वर काय परिणाम होत आहे हे आपल्याला लक्षात येईल. इथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक व्यक्तीचा डायबिटीस  हा वेगवेगळ्या टप्प्यावर असल्याकारणाने आपण  आपल्या आहारावर व्यक्तीसापेक्ष नियंत्रण ठेवले पाहिजे

 

 परंतु सर्वसाधारणतः योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत सेवन करून डायबिटीसचे रुग्ण आंब्याचा आस्वाद नक्कीच घेऊ  शकतात.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *